Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठणच्या कारकीन येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. पतीने आधी राहत्या घरात पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेतच तिला गावाच्या चौकात सोडत आरोपी फरार झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी फरार झालेल्या आरोपी पतीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोनाली आतिष ताकवाले (वय 25 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, आतिष रावसाहेब ताकवाले (वय 30 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठणमधील सोनाली आणि आतिष कारकीन गावात आपल्या मुलीसह राहतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या आसपास काहीतरी कारणावरून सोनालीने आपल्या मुलीला मारहाण केली. त्यांनतर मुलीला मारू नको अशी भूमिका आतिषने घेतल्याने पत्नी पत्नीमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक असलेला वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. अतिष हा प्रचंड रागात होता. त्यातच त्याने घरातील कुऱ्हाडीने थेट सोनालीवर वार केला. ज्यामध्ये सोनाली गंभीर ही जखमी झाली.
कुऱ्हाडीने सोनालीच्या डोक्यावर हल्ला केल्याने ती जागीच कोसळली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. मात्र, त्यानंतर देखील अतिषचा राग कमी काही झाला नाही. गंभीर जखमी असलेल्या सोनालीला त्याने तिला गावातील रस्त्यावर ओढूत आणले. तिथे पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार करून तिला जागीच ठार केले. त्यानंतर तो मुलीला घेऊन तिथून फरार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.
पाठलाग करून पकडला आरोपी
कारकीन गावातील रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा मृतदेह सोनाली आतिष ताकवाले यांचा असल्याचे समोर आले. या दरम्यान आतिष ताकवाले आणि त्याची मुलगी घरात दिसत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता आतिषनेच सोनालीची हत्या करून तो फरार झाला असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने तात्काळ अतिषचा शोध सुरु केला आणि त्याचा पाठलाग करता त्याला बेड्या ठोकल्या. आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली आतिषने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पैठण एमआयडीसी पोलिसांत आतिष विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.