तुळजापूर : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून धीरज कदम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सलग पाचवेळा आमदार झालेले तसेच दांडगा जनसंपर्क असुनही माजी मंत्री मधुककरराव चव्हाण हे नाराज झाले. त्यामुळे मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या वाटाघाटी दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा सुटला आहे. काँग्रेस पक्षातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे इच्छुक होते. तसेच त्यांनी दोन उमेदवारी अर्ज देखील घेतले होते. याबरोबरच विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद धाराशिवचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट धीरज कदम पाटील हे सुद्धा इच्छुक होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या ऐवजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट धीरज कदम पाटील यांना संधी दिल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण नाराज झाले होते. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असून ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत.
दरम्यान, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी दिल्यास काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज कदम पाटील यांना मताचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत मधुकरराव चव्हाण?
तुळजापूरच्या राजकारणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे वजन आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येण्याचा मान मधुकर चव्हाण यांनी मिळवला आहे. 1962 मध्ये लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून तुळजापूर तालुक्यातून मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यापूर्वी ते कापडाचा व्यवसाय करत होते. 1967 मध्ये काकंब्रा गणातून विजयी झाले, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. कालांतराने मधुकरराव चव्हाण तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती बनले होते. त्यानंतर 1972 मध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली. मधुकरराव चव्हाण यांनी पक्षांतर्गत वेगवेगळे भूषविले आहेत. आज त्यांचे वय 90 झाल्यामुळे त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.