जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. यावेळी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे पोहचले आहेत. संभाजीराजे उपोषणास्थळी पोहचल्यावर मनोज जरांगें यांच्या तब्यतेची चौकशी केली. तसेच उपोषणस्थळावरुन त्यांनी मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार असणार आहे, असा इशाराही सरकारला दिला आहे.
यावेळी बोलताना संभाजीराजे पुढे म्हणाले, सरकार मुंबईतील एअर कंडिन्शन्स ऑफिसात निवांत बसले आहेत. विरोधी पक्षातील नेतेसुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. मनोज जरांगेंना काय सांगायचं ते सांगितलं. तब्येतीच्या बाबत चर्चा झाली. त्यांनी मला शब्दही दिला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
सरकारला सूचना आहे. मेडिकल रिपोर्ट घ्या. किडन्यांचं फंक्शनिंग काय आहे, लिवरचं फंक्शनिंग कसं आहे देव जाणे, ब्लड प्रेशर लो झालं आहे. याचं तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय?, असा सवाल संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे.
राज्याच्या इतिहासातील ही शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. तरी देखील त्याची दखल सरकारने अजुनही घेतलेला नाही. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली याबद्दल मला समजलं त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येथे आलो असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.