औरंगाबाद : एमआयएमकडून महाविकास आघाडीला आगामी निवडणूकांसाठी ऑफर देण्यात आली आहे. यावरूनच महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी पक्ष बदलावा असे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावे. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीत यावे,” अशी नवीन ऑफर जलील यांना अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तसेच, इम्तियाज जलील जरी इंडिया आघाडीत येण्याचं सांगत असेल, पण यासाठी त्यांच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का?,” असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते जलील?
आमच्यावर भाजप बी टीमचा आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना युतीची ऑफर आम्ही दिली होती. त्यामुळे त्यांची अडचण झाली. त्यांच्यासाठी ही ऑफर अजूनही कायम आहे. भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करावी लागेल. त्यांनी यासाठी विचार करावा. महाविकास आघाडीची युती कशी आहे त्यावर तिन्ही पक्षांनी विचार करावा. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचं की नाही यावर त्यांनी निर्णय घ्यावा. तसेच महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर नक्की विचार करू. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.
शिवसेन एमआयएमला मानत नाही
अंबादास दानवे यांनी जलील यांच्यासह एमआयएम पक्षावर टीका देखील केली आहे. एमआयएम आणि आमच्या पक्षाचे वैचारिक रित्या जमणं कठीण आहे. शिवसेना (ठाकरे गट) एमआयएमला मानतच नाही. एमआयएम जातिवादी संघटना आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे, अपघाताने ती इम्तियाज जलील यांच्याकडे गेली आहे. तरीही जलील यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा असल्यास त्यांनी एमआयएम पक्ष सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा. कारण या दोन्ही पक्षात अनेक मुस्लिम नेते आहेत, असे दानवे म्हणाले.
वडेट्टीवार काय म्हणाले
दरम्यान, जलील यांच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्षाची देखील प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर बोलतांना म्हटले आहे की, “आघाडी कुणासोबत करायची, याबबात 29 तारखेच्या च्या बैठकीत चर्चा करू, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावे, आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर 29 तारखेच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.