भोकर : नांदेड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. भोकर ते म्हैसा रस्त्यावरील पिंपळढवजवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघे जण ठार, आणि एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २३ जुलै रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भोकर परिसरात पिंपळढव येथे घडली आहे. मृतातील दोघे मातुळ येथील आश्रमशाळेचे कर्मचारी होते.
गंगाधर विश्वनाथ म्हैसुरे (वय-५५, रा. शिळवणी, ता. देगलूर. ह. मु. भोकर), तर परसराम किशन डाकोरे (वय-५०, रा. पांडुरणा, ता. भोकर) व दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड (वय-२५, रा. नांदा बु.), विनायक बुरोड (वय-२५, रा. नांदा बु.) अशी मृत्यू झालेल्या चाैघांची नावे आहेत. तर श्रावण हनुमंत पेडेमोडे (वय-२३, रा. कुंभरगाव, ता. बिलोली) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दुचाकी (क्र.एमएच २६ सीके ६६५९) व दुचाकी (क्र.एमएच २६ सीएफ ९६१८) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चाैघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. म्हैसुरे व डाकोरे हे दोघे कै. व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस व कामाठीपदावर कार्यरत होते.