परळी : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सद्या परळी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांचा सामना रंगणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रात 5 अपत्यांचा उल्लेख केला आहे.
शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख..
धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांच्याकडून जे शपथपत्र देण्यात आले होते. त्यामध्ये या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. कारण ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते असं या शपथ पत्रावरून लक्षात येत आहे. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जात असतो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 3 अपत्यांचा उल्लेख..
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी वैष्णवी धनंजय मुंडे तसेच जानवी धनंजय मुंडे आदीश्री धनंजय मुंडे या तीन अपत्यांचाच उल्लेख होता. मात्र आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथपत्रात एकूण पाच अपत्यांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला आहे.
शपथपत्रात पाच आपत्यांचा उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे..
1. शिवानी मुंडे
2. सीशिव मुंडे
3. वैष्णवी मुंडे
4. जानवी मुंडे
5. आदीश्री मुंडे