नांदेड: नांदेडचे माजी खासदार चिखलीकर यांना फेसबुक व्हिडीओवरुन धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्याविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
लोहा येथील रहिवासी आणि भाजपा कार्यकर्ते भास्कर धोंडिबा पवार (वय ४४) यांनी गुरूवार दि. १७ ऑक्टोबर रोजी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, मी माझ्या कुटुंबासह लोहा येथे राहतो. मी भाजपा युवा मोर्चाचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व लातूर जिल्हा संपर्क प्रमुख आहे. बुधवार दि.१६ ऑक्टोबर २४ रोजी रात्री मी फेसबुक पाहत असताना १० च्या सुमारास ‘आम्ही नांदेडकर’ या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पाहण्यात आला. या व्हिडीओमध्ये शिवसेना उबाठाचे उपनेते शरद कोळी हे पत्रकार परिषदेतून नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे हातपाय तोडण्याची धमकी देत होते. तसेच नामर्दाची अवलाद, मस्तवाल, माजखोर, खुब्यातून हात छाटला जाईल, अशी अत्यंत खालची भाषा कोळी यांनी वापरली. त्यामुळे चिखलीकरांची बदनामी करण्यात आली आहे.
कोळी यांच्या या व्हिडीओतील भाषेमुळे आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कोळी यांनी सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शरद कोळी यांच्याविरुद्ध लोहा पोलिसांनी नियमानुसार कडक कारवाई करावी. या तक्रारीनंतर लोहा पोलिसांनी शरद कोळी यांच्याविरुद्ध गुरनं ३५१/२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २९६, ३५१-२, ३५२, ३५६-२ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोहा पोलिस करीत आहेत.