नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता अमित शाह यांनी भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकावर चांगलीच तोफ डागली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्धव ठाकरेसह काँग्रेसवर अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना अर्धी झाली, शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी झाली या दोघांनी काँग्रेसलाही अर्ध करुन टाकलं असं अमित शाह म्हणाले.
आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती आहे. या देशात सामाजिक क्रांती आणण्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं होतं. ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाईंना मी विनम्र अभिवादन करतो. काँग्रेसला वाटतं की वातावरण बिघडलं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो वातावरण इथलं बिघडलं आहे. देशातलं वातावरण उत्तम आहे. प्रतापराव चिखलीकर रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकतील. ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे हे विसरु नका. आपण ४०० पार जाणार आहोत हे विसरु नका, असंही अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना, तर दुसरी नकली राष्ट्रवादी आणि एक आर्धी उरलेली काँग्रेस. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा, काम बिघाडा. मी आपल्याला सांगायला आलोय की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला आर्ध करण्याचं काम केलं आहे.
हे तीन आर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का? ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचं आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.