Chhagan Bhujbal : बीड जिल्ह्यामधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. राज्याच्या गुप्तचर खात्याचे ते अपयश असल्याचा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे फक्त ओबीसी समाजाचे असल्यानेच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला असल्याचंही भुजबळ म्हणाले. तसेच ओबीसीमधून मराठा आरक्षणाला आमचा तीव्र विरोध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
भुजबळ काय म्हणाले?
मी बीड आणि माजलगाव गेलो होतो. मी आणि माझ्या पक्षाने मराठा आरक्षणाला विरोध केला नाही.आम्ही फक्त हे म्हणतो आहे की आमच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता द्या. ओबीसीमध्ये अनेक छोट्या जाती आहेत त्यामध्ये मराठ्यांना काही मिळणार नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे, तीच शिंदे, शरद पवार, फडणवीस यांची आहे. हे आंदोलन सुरू झालं आणि त्यामध्ये प्रचंड नासधूस केली. बीडमधील सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्यानंतर त्यावेळी मी सांगितले होते की, हॉटेलला संरक्षण द्या. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी हल्लेखोरांच्यासोबत कोयते,पेट्रोल बॉम्ब होते.
या हल्ल्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबातील कोणी सापडले तर वाचले नसते. सांकेतिक नंबर दिला होता. हे सर्व ठरवून केलं गेलं होतं, अचानक घडलं नव्हतं. आमदार सोळंके बोलतात हे अगदी खरं आहे. आरक्षण मिळाल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील असं नाही, जे प्रकाश सोळंके म्हणाले त्यात चुकीचं काय? पोलीस हतबल का झाले? याची प्रथम चौकशी व्हावी. पोलिसांना माहिती नव्हती का, हल्लेखोरांकडे शस्त्र होतं, काठ्या होत्या, पोलिसांनी थोडा तरी प्रतिकार करायला हवा होता.