नांदेड : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपलं राजकीय अस्तित्व कुठे उजळून निघेल याची चाचपणी करताना दिसत आहेत. अशातच आता माजी खासदार आणि भाजप नेते भास्कर पाटील खतगावकर हे आज त्यांच्या सून मीनल खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी तीन वाजता मुंबईतील काँग्रेस कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. खतगावकर हे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आहेत. भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खतगावकर यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच खतगावकर यांनी नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. ते आज आपल्या सुनेसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून भास्कर पाटील खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर या नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे.
भास्कर पाटील खतगावकर यांचा राजकीय प्रवास..
- जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून राजकारणाला सुरुवात
- 1990 साली बिलोली मतदार संघातून विधानसभेत , तीन वेळा आमदार
- 1998 साली नांदेडचे खासदार
- तिन वेळा खासदार
- 2014 साली लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज, नंतर भाजपात प्रवेश
- 2021 साली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश
- अशोक चव्हाण भाजपात गेल्याने पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये भाजपात प्रवेश
- त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश