नांदेड: आरक्षणासाठी मराठा समाज अतिशय आक्रमक झाला आहे. राज्यातील गावागावांत पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. तसेच गावबंदीचे बॅनर देखील लावले जातं आहेत. अशातच गुरुवारी रात्री नांदेडमधील भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात प्रवेश केल्याने आंदोलकांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा विरोध करत ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात सदर घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे शुक्रवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांची भेट घेण्यासाठी ते गेले होते. ग्रामस्थांकडून या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान गावात प्रवेश करताच मराठा बांधवानी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा विरोध केला. तसेच त्यांना परत जाण्याची विनंती करण्यात आली. याच दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे दोन वाहनांच्या काचा फुटल्या. दरम्यान या घटनेनंतर गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.