बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडसह सर्व आरोपींवर मकोका लागला आहे. आता बीडमधील एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगविरोधात देखील पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी की, बीड मधील एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगच्या सहा जणांवर मकोका लावण्यात आला आहे. अक्षय गँग मधील सहाजणांपैकी आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात मनीष क्षीरसागर, अक्षय आठवले, ओंकार सवाई यांना अटक करण्यात आली आहे, तर सनी आठवले याच्यासह अजून एक आरोपी फरार आहे. जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर आता बीडमध्ये दुसऱ्यांदा मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बीडमधील डोंगरे गट आणि आठवले गटातील जुन्या वादातून गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये डोंगरे गट आणि आठवले गट यांच्यात वैर होतं. त्यांच्यात झालेल्या जुन्या भांडणातून गोळीबार झाला होता. या घटनेमध्ये विश्वास डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. डोंगरे आणि आठवले यांच्यात अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. दोन्ही गटातील राड्याच्या अनेक घटना आहेत. त्यानंतर दोन्ही गटांनी एकदुसऱ्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर अक्षय आठवलेने डोंगरेच्या घरात घुसून गोळीबार केला होता.
या गोळीबारात विश्वास दादाराव डोंगरे हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली होती. आता त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे, या प्रकरणातील चार आरोपी अटकेत आहेत तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.