हिंगोली : हिंगोलीमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नवरात्री उत्सवानिमित्त देवदर्शन करुन दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. १०) रोजी हिंगोली-रिसोड राज्य मार्गावरील सेनगावजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गणेश मुंडे आणि सविता गणेश मुंडे अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. मृत दाम्पत्य सेनेगाव तालुक्यातील हिवरखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवानिमित्त मुंडे हे दोघे पती-पत्नी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरुन आले होते. दर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तळणी फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात गणेश आणि सविता दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मुंडे दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. ऐन नवरात्री उत्सवात पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरु होती.