परभणी : धनगर समाजाचा मोर्चा संपवुन परत निघालेल्या परभणी जिल्ह्यातील मोर्चेकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघतात दोन धनगर आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्तराव वाघमारे असं मृत व्यक्तीचे नावं आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाकडून काल मोर्चा काढण्यात आला होता. सरफराजपुर गावातील धनगर समाजाचे काही नागरिक या मोर्चाला गेले होते. मात्र परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. (Dhangar Reservation)
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील पालम येथील सरफराजपुर गावातील धनगर समाजाचे काही नागरिक नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चाला गेले होते. परत येत असतानाच रात्री तीन वाजण्याच्या सुमारास माहूरजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या पालम तालुक्यातील सरफराजपुर गावातील अनेकजण धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चासाठी गेले होते. मोर्चा झाल्यानंतर हे सर्वजण परत गावाकडे येत होते. यावेळी रात्री तीन वाजेच्या सुमारास माहूरजवळ या नागरिकांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
या धडकेत लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्तराव वाघमारे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, रंगराव संपतराव वाघमारे, राम बालाजी बनसोडे, बापूराव मारोती वाघमारे हे अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.