नांदेड : नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी परिसरातील खदानीमध्ये पोहण्यास गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण सुदैवाने बचावला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ०६) दुपारच्या सुमारास घडली. मृत्यू झालेले सर्वजण इयत्ता बारावीत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लोहा तालुक्यातील झरी परिसरात विद्यापीठाच्या बाजूला एक मोठी खदान आहे. या खदाणीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते. पोहताना खदाणीमधील पाण्याचा अंदाज न आल्याने पाचपैकी चार मित्र बुडाले. या घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये शेख फुज्जाइल, काजी मुजम्मिल, आफान आणि सय्यद सिद्दिकी याचा समावेश आहे. तर मोहम्मद फैजान हा बचावला आहे.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना सुरुवातीस दोन आणि नंतर काही वेळाने दोन अशी चौघांची मृतदेह आढळून आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.