कळमनुरी: नगरपरिषद कळमनुरीच्या अंतर्गत नांदेड, हिंगोली या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरणाची कामे शहरात सुरू आहे, याकरीता रस्त्यालगतची मोठी झाडे तोडून टाकण्यात आली. यातच दोनशेपेक्षा जास्त वयाची वडाची झाडे देखील तोडल्या जात असताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या संकल्पनेतून सदरची झाडे मुळातून काढून नगरपरिषद कळमनुरीच्या हिंदू स्मशानभूमीत स्थलांतरित करण्याचे ठरल्यानुसार सहा झाडे स्थलांतरित करून पुर्नरोपित करण्यात आली होती.
नगर परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी रवीराज दरक, नगर अभियंता निकेत यरमाळ, करण चापके व वनखात्याचे सेवानिवृत्त अधिकारी वाजेद यांच्या सहकार्याने व परिश्रमाने सहा झाडांचे स्थलांतर करण्यात आले होते. सदरची झाडे पुर्नरोपित करण्यात आली आहेत. या झाडांना नियमितपणे पाणी घालून त्यांना जगविण्याचा मानस नंदकिशोर तोष्णीवाल यांनी व्यक्त केला होता. त्यांनी सदर झाडांना स्वखर्चाने १० टँकरव्दारे पाणी टाकले.
तर नगर परिषदेने पण पाण्याचा खर्च उचलला. दोनशे वर्षे जुनी झाडे स्थलांतरित करण्याचा हा प्रयोग प्रथमतःच शहरात करण्यात आला. या सहा झाडांपैकी एका झाडाला नवीन पालवी फुटली असून वडाचे झाड स्थिरावले आहे. उर्वरित पाच झाडे पावसाळ्यात वाचविण्याची खात्री असल्याचे तोष्णीवाल यांनी सांगितले.