छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन सुरू केलेली नांदेड -हडपसर ही विशेष रेल्वे परतीच्या प्रवासात परभणीहून नांदेड येथे पोहोचण्यासाठी पावणेचार तासांचा वेळ घेणार आहे. १५ किलोमीटर प्रति तास ही रेल्वे धावणार असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावरून पुणे येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी उन्हाळ्यात विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड-हडपसर (०७६२५) ही रेल्वे दर बुधवारी नांदेड येथून रात्री ९ वाजता सुरू केली आहे. या रेल्वेच्या जाताना ६ आणि परतीच्या ६ अशा बारा फेऱ्या होत आहेत. नांदेड ते हडपसर या ११ तासांच्या प्रवासासाठी १४ तासांचा वेळ घेण्यात आला आहे. तीन तासांचा लूज टाईम ठेवला आहे. तर हडपसर येथून नांदेडला येणाऱ्या रेल्वेचे परतीचे वेळापत्रकही गैरसोयीचे केले आहे. हडपसर येथून दुपारी ३.१५ वाजता ही रेल्वे नांदेडकडे प्रवासाला निघणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या रेल्वेला परभणी ते नांदेड या ६० किलोमीटर अंतरासाठी पावणेचार तासांचा वेळ लागणार आहे. १५ किलोमीटर प्रति तास अशा कासवगतीने ही रेल्वे धावणार आहे. वेळापत्रकानुसार हडपसर-नांदेड रेल्वे रात्री १२.४३ वाजता परभणी रेल्वे स्थानकावर पोहोचणार असून, १.४५ वाजता पूर्णा रेल्वेस्थानक आणि नांदेड रेल्वे स्थानकावर पहाटे ४.३० वाजता पोहोचणार आहे. ६० किलोमीटर अंतरासाठी ४ तासांचा वेळ लागणार असल्याने प्रवाशांसाठी हे वेळापत्रक अतिशय गैरसोयीचे होत आहे. रेल्वे प्रशासनाने या रेल्वेगाडीचा लूज टाईम कमी करावा व प्रवाशांच्या सोयीनुसार वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी होत आहे.