पुणे : राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत मात्र हा पाऊस काहीशी विश्रांती घेताना दिसणार असला तरीही अधुनमधून येणाऱ्या सरी मात्र नागरिकांची तारांबळ उडवताना दिसणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय कमाल आणि किमान तापमान 30 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे आज देखील कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.