अलिबाग : पर्यटक म्हणून आलेल्या मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिकेने अलिबागमधील एका कॉटेजमध्ये आत्महत्या केली. नेहा अविनाश पोतदार (३४) असे तिचे नाव असून तिने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगची शिक्षिका असलेली नेहा ही गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षण देत होती. तेथून ती ३० सप्टेंबर रोजी अलिबागला आली होती. अलिबागच्या कुरूळ येथील एका कॉटेजमध्ये ऑनलाइन बुकिंग करून राहिली होती. बुधवारी सकाळी ती रूमबाहेर आली नसल्याने कर्मचाऱ्याने दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी दरवाजा उघडला असता नेहा मृतावस्थेत आढळली. नेहाने आपले आयुष्य संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर लिहिला आहे. तसेच कॉटेजचे भाडे व जेवणावाल्याचे उर्वरित पैसेही तिने तेथे ठेवले होते. नेहाच्या मृतदेहाचा पंचनामा झाल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे