रायगड : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील तसंच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच आता रायगड जिल्ह्यामधये देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एका वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये काल ३० ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनीच या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माणगाव तालुक्यातील जावळी येथील वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली आहे. माणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वसतीगृहातील इतर मुलांमध्ये मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. माणगाव पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने फिरवली आहेत. पीडित मुलाची सध्या वैद्यकीय चाचणी केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
वसतिगृहामधील एका खोलीत तीन अल्पवयीन विद्यार्थी राहत होते. यातील दोन मोठ्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या रूममधील लहान मुलावर अतिप्रसंग केला आहे. ही गंभीर बाब वसतिगृहाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नजीकचे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी अलिबाग जिल्हा रुग्णालयात केली जाणार आहे.