विक्रमगड : मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने उमेदवाराचा प्रचारा ताफा दिवसभर ग्रामीण भागात फिरत आहे. परंतु, सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. तसेच लहरी पावसामुळे मतदार शेतकरी सकाळपासूनचं शेतात असल्याने कार्यकर्त्यांच्या भेटी होताना दिसत नाही. नाहीतर कार्यकर्त्यांना शेतावरच मतदारांची भेट घ्यावी लागत आहे.
विक्रमगड विधानसभा मतदार संघात एकूण मतदार ३१३६१३ इतके आहेत. तर महिला मतदार १५७११८, पुरुष मतदार १५६४९४ एवढे आहेत. जवळजवळ ७० टक्के मतदार हे खेड्यापाड्यात राहतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीचे दिवस करताना कार्यकर्ते दिसत आहेत.
या भागातील मतदाराला विकास हवा आहे. त्यामुळे जो या भागातील विकास करील त्यालाच मतदान करणार, असे मतदारांचे म्हणणे आहे. जसजसे प्रचाराचे दिवस कमी होत आहे, तसा प्रचार रात्रंदिवस सुरू आहे व मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. अशातच शेतीचा हंगामा सुरू असल्याने अनेक प्रचार करणारे कार्यकर्ते थेट शेतात जाऊन प्रचार करू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.