पनवेल: मागील पाच वर्षांपासून परिमंडळ २ कार्यक्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ५ गुन्ह्यांत जप्त केलेला १२ लाख ५६ हजार ८५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या उपस्थितीत शनिवार, ८ जून रोजी नष्ट करण्यात आला. तसेच ४० गुन्ह्यांतील २ लाख ६० हजार ७६५ रुपयांची अवैध दारू देखील खड्यात ओतून नष्ट करण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमित बडदे व अन्न व औषध प्रशासनाचे डी. जी. वीर हे देखील उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने नवी मुंबईत प्रतिबंधित गुटखा, अवैध दारू, अंमली पदार्थांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या अनुषंगाने जप्त केलेला मुद्देमाल दुर्गंधी पसरत असल्यामुळे नष्ट करण्यात येत आहे.