माथेरान: थंड हवेचे ठिकाण म्हणून बिरुदावली असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान हे संपूर्ण परिचित आहे. या पर्यटनस्थळी तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. येथील तापमान ११.२ अशांवर गेल्याने गुलाबी थंडीत माथेरानचे पर्यटन बहरत असून पर्यटक याचा मनमुराद आनंद घेत आहेत.
समुद्रसपाटीपासून २,६३६ फूट उंचीवर असलेले प्रदूषणमुक्त, वाहनमुक्त पर्यटनस्थळ माथेरानमध्ये गुलाबी थंडी पसरली असल्याने पर्यटक या थंडीचा मनमुराद आनंद घेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७ आणि ८ डिसेंबरला विकेंड असल्याने हे पर्यटनस्थळ पर्यटकांनी बहरले.
शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत १३ हजार पर्यटक येथे दाखल झाले होते. यादरम्यान रविवारी थंडी वाढू लागली. या गुलाबी थंडीत पर्यटकांनी माथेरान फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, मक्याचे कणीस, भजी आणि चहा तसेच मॅगीच्या दुकानांवर गर्दी दिसून आली. उंच झाडे असल्यामुळे गुलाबी गारवा अंगावर घेत पर्यटक माथेरानमधील बाजारपेठ मनसोक्त फिरताना दिसत होते.
रविवारी येथील तापमान ११.२ अंशावर पोहोचल्याने पर्यटकांसह नागरिक उबदार कपडे परिधान करून फिरताना दिसले. माथेरानचा पारा दर दिवशी घसरत असल्याने येथील पर्यटन आणखी खुलेल, असा अंदाज येथील व्यावसायिकांनी बांधला आहे. मुंबई-पुण्यापासून माथेरान हे पर्यटनासाठी जवळ असल्याने ही गुलाबी थंडी राहिली, तर पुढील काही दिवस पर्यटकही वाढतील, असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करत आहेत.