रत्नागिरी : उत्पन्नापेक्षा तब्बल 118 टक्क्यांनी संपत्ती जास्त असल्यामुळे राजन साळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी सकाळपासून एसीबीकडून झाडाझडती सुरू होती.
आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख इतकी आहे. 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीने केला आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
राजन साळवेंची प्रतिक्रीया
मी लेचापेचा शिवसैनिक नाही, परिणामांची पर्वा मी करत नाही असं राजन साळवी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले. माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला हे दुर्दैव आहे, शिंदे गटात न गेल्यानं परिणाम भोगावे लागणार असल्याचं राजन साळवींनी म्हटलं आहे.
कुटुंबीयांची एसीबीकडून चौकशी
राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. साळवी यांचे बंधू, पुतणे यांचीही चौकशीला झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित होते. मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
राजन साळवींचं घर, हॉटेलचं एसीबीकडून मुल्यांकन
राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात आली. एसीबी चौकशीसाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आले होते. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आले.