Crime News: रायगड: रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात खळबळ उडवणारी घटना घडली असून खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली असून खोपोली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, पक्षाचे प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर तसेच इतर तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश काळोखे यांचा पाठलाग करून त्यांना खाली पाडले. त्यानंतर इतर तीन आरोपींनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. निवडणुकीतील पराभव, राजकीय वाद आणि पूर्वीच्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मंगेश काळोखे यांच्या मामेभावाने गंभीर आरोप केले असून खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि आरोपी यांची सांगड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मंगेश काळोखे आणि त्यांच्या पुतण्याने यापूर्वी आपल्याला धोका असल्याची माहिती पीआय सचिन हिरे यांना दिली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पीआय सचिन हिरे यांचे वर्तन संशयास्पद असून त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.






