पुणे : पुणे जिल्हा आणि परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे विभागाला 100 बस मिळणार असून त्यापैकी 25 बस आधीच दाखल झाल्या आहेत. या बस सध्या विविध ग्रामीण मार्गांवर शटल सेवा म्हणून धावत आहेत.

पुण्यातून राज्यातील अनेक भागांना बससेवा उपलब्ध असली तरी जिल्ह्यातील लहान शहरे, गाव आणि उपनगरांना जोडणाऱ्या शटल सेवांची संख्या मर्यादित आहे. ही गरज लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने एसटी महामंडळाकडे 250 नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 100 बस उपलब्ध होणार आहेत.

दाखल झालेल्या 25 बसपैकी शिवाजीनगर आगाराला पाच बस देण्यात आल्या असून त्या शिवाजीनगर-भीमाशंकर मार्गावर धावत आहेत. स्वारगेट आगारालाही एक बस देण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बस सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणाऱ्या असून सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक बसमध्ये 56 आसनांची क्षमता आहे. सुरक्षेसाठी पाच सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटण बसविण्यात आले आहे. तसेच जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, इलेक्ट्रॉनिक माहिती फलक आणि पुढील थांब्याची माहिती देणारी स्वयंचलित उद्घोषणा यंत्रणाही उपलब्ध आहे.
पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले की, उर्वरित बस पुढील महिनाभरात मिळण्याची अपेक्षा आहे. या बस विविध आगारांना देऊन ग्रामीण भागातील शटल सेवा अधिक मजबूत करण्यात येणार आहे. कोणत्या मार्गांवर बस सुरू करायच्या याचे नियोजनही करण्यात आले असून यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.







