अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शिरूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने एकाच दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १८ वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नखाते, पोलीस हवालदार वाघमोडे, महिला पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अत्यंत सक्रिय झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये वाहतूक शिस्त, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आगामी काळात आणखी कठोर मोहिमा राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे पाटील यांच्या या धडाकेबाज कामगिरीची चर्चा सध्या संपूर्ण शिरूर शहरात रंगू लागली आहे.







