शिरूर : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजातील गंभीर समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी एक किंवा अधिक मुली असलेल्या गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत नियमित ट्रॅकिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून,दुसरीकडे कफ सिरपसह काही द्रवरूप औषधांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी ही औषधे आता डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करता येणार नाहीत.

राज्यात स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत संबंधित गर्भवतींच्या गर्भधारणेचा नियमित पाठपुरावा केला जाणार आहे.गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत प्रत्येक प्रकरणावर लक्ष ठेवून त्याची नोंद केली जाणार असून,जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दरमहा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या माध्यमातून संशयास्पद प्रकरणांवर वेळेत कारवाई करणे आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.दरम्यान,कफ सिरप आणि इतर काही द्रवरूप औषधांचा नशेसाठी व गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कठोर पाऊल उचलले आहे.
यापुढे डॉक्टरांच्या वैध चिठ्ठीशिवाय कफ सिरपसह काही औषधांची विक्री करता येणार नाही.शहरांसह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल स्टोअर्सना हा नियम लागू राहणार असून,प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महिलांच्या संरक्षणासाठी, स्त्रीभ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी तसेच औषधांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने घेतलेले हे दोन्ही निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून,त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास समाजावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






