ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आयटीआय वागळे इस्टेट येथे उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे २००९ पासून आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. याकरिता शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता जागृती क्रीडा मैदान परबवाडी शाखा येथे एकत्र यावे, असे आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरी- पाचपाखाडी या मतदारसंघातून आता विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.