Maharashtra SSC-HSC Exams : दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांमध्ये कॉपीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल उचलले आहे.

परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि शिस्तीच्या दृष्टीने मंडळाने अनेक नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, त्याचे रेकॉर्डिंग 30 दिवस जतन करणे बंधनकारक असेल.
शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार, परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. परीक्षा काळात केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल, जेणेकरून अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही आणि गोंधळाची शक्यता टळेल.
याशिवाय, मंडळाने 15 नोव्हेंबरपासून सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीदरम्यान केंद्रांवर पक्की संरक्षक भिंत, सीसीटीव्ही व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. ज्या केंद्रांवर या सुविधा उपलब्ध नसतील, त्यांची मान्यता रद्द केली जाईल.
पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे, पक्की भिंत आणि मूलभूत सुविधा नसलेल्या केंद्रांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा देता यावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शिक्षण प्रणालीवरील विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







