अमित मुंडीक

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बावधन–पाषाण ३६ मीटर डीपी रस्ता आता पूर्ण क्षमतेने विकसित करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण लवकरच करण्यात येणार असून, त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
आज माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री. प्रशांत ठोंबरे, भूसंपादन विभागाचे उपायुक्त श्री. निखिल मोरे, तसेच पथ, बांधकाम आणि ड्रेनेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या बहुतांश लांबीवरील जागा एफएसआय आणि टीडीआरच्या माध्यमातून मनपाच्या ताब्यात आली आहे. या जागांवर पूर्ण ३६ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याच्या सूचना पथ विभागाला देण्यात आल्या आहेत.
तसेच, सुमारे ४० गुंठे वन विभागाची जमीन या रस्त्याच्या रुंदीकरणात येत असून, ती जागा डिसेंबर अखेरपर्यंत मनपाच्या ताब्यात आणण्याचे स्पष्ट आदेश श्री. दिवटे यांनी दिले आहेत.
रस्ता विकसित करताना ड्रेनेज आणि पावसाळी ड्रेनेज लाईनची कामे समांतरपणे करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून पुढील काळात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
या पाहणीमुळे बावधन–पाषाण परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच पुण्याला एक आधुनिक आणि सुसज्ज रस्ता मिळणार आहे.







