पुणे : राज्यात शिवसेना फुटीच्या धक्क्यातून जनता सावरते न सावरते तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंड झाले. अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडत 40 हून अधिक आमदार आपल्या बाजूने करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पक्ष फुटीनंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले.त्यानंतर आता तब्बल दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी 7 मे रोजी कोर्टासमोर लागलेले आहे. त्यामुळे आता 7 मे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येते का? हे पाहणे महत्वाचे आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावरसुद्धा निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे शरद पवार गटाकडून आयोगाच्या निर्णयास आव्हान देण्यात आले होते. शरद पवार गटाच्या याचिकेवर अनेक दिवसांपासून सुनावणी नव्हती. आता राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे