पुणे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गेले अनेक वर्षे ग्रामपंचायती निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे अनेक इच्छुकांना मतदारांची मन धरणी करताना नाकीनव येवू लागले. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी कमी असून सदरचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची पहिल्या दिवशी निराशा झाली. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी तोच ठेवत सकाळी ११ ते ३ हा पूर्वीचा कालावधी निश्चित केला होता. हा कालावधी २.३० तासाने वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निश्चित केला.
दरम्यान, अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.