नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत जवळ येत असतानाच आता दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. आरक्षणाबाबत कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजे यांना माहिती असल्याने ते यासाठी विशेष पुढाकार घेत आहेत. आज (ता. २८) दुपारी ३ वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.(Chhatrapati Sambhaji Raje)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केला आहे. या सभांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्यभर ठिकठिकाणी उपोषण, आंदोलने सुरु आहेत. यामुळे आरक्षणासाठी वातावरण निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केल्याच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजीराजे त्यांच्या मदतीला धावून येत आहेत.(Maratha reservation)
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणास्थळी देखील संभाजीराजे यांनी भेट देऊन आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केली होती. आज याच कारणासाठी छत्रपती संभाजीराजे दिल्लीत पोहचले आहेत. संभाजीराजे हे केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजेंसोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ आहे. यामुळे आजच्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळविण्यासाठी कायदेशीर लढाई लढणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी आपण राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी या वेळी बोलताना सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. ज्यात स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर, रघूनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, संजय पवार, गणेश सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.