कोल्हापूर : कोल्हापुरात किरकोळ कारणातून एकाचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद होताच ‘आता मुंबई कशी जिंकणार?’ असे म्हटल्याचा राग अनावर झाल्याने दोघांनी मिळून एका क्रिकेटप्रेमीचे डोके फोडले होते. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटप्रेमीची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. २७ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले होते.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहते असलेल्या बंडोपंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी रागात बळवंत आणि सागर यांनी जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांचा राग अनावर झाला होता.
दरम्यान, रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी संतप्त झालेल्या बळवंत आणि सागर यांनी त्यांच्या डोक्यात हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.