सागर जगदाळे
भिगवण : कोरोनाच्या काळात ज्याच्या खांद्यावर बसून अख्खे जग बघण्याची स्वप्न पाहिले तो आधार देणारा बाप अचानकपणे हे जग सोडून जातो. या भल्यामोठ्या संकटावर पाय ठेऊन आपल्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची मुलगी पुन्हा मोठ्या धैर्याने उभी राहते. पळसदेवसारख्या ग्रामीण भागातील असणाऱ्या वर्षा भैरवनाथ बनसुडे हिची ही कथा…!!
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा किशोरी गट कबड्डी संघात नुकतीच तिची निवड झाली आहे. दि १५ ते १८ डिसेंबर २०२२ रोजी अहमदपुर, लातुर येथे होणाऱ्या ३३व्या राज्यस्तरीय किशोरी गट कबड्डी स्पर्धा होणार आहेत. यासाठी वर्षाची पुणे जिल्हा किशोरी गटात निवड करण्यात आली. पुणे संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नुकतीच पळसदेव मधून रवाना झाली.
कबड्डीपटू वर्षाचे वडील शेतकरी होते. कोरोनाच्या काळात त्यांचे कोरोनाने निधन झाले.लहानपणापासूनच खेळाची आवड होती. मात्र, वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तिने हीच खेळाची आवड पुढे जोपासली. तिच्यातली खेळाची कौशल्ये तिचे क्रीडाशिक्षक सागर बनसुडे यांनी हेरून तिला कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन दिले. तिनेही आपल्या गुरूंच्या शब्दाला महत्व देत तेवढ्याच जोमाने एस.बी स्पोर्ट्स पळसदेव या अकादमीमध्ये कबड्डी खेळाचा सराव सुरू केला. सोबत एल जी बनसुडे स्कुल या शाळेनेही मोलाची साथ तिच्या या कठीण काळात तिला दिली. शाळेतून मिळणारे प्रोत्साहन तिच्यासाठी महत्वपूर्ण ठरले. त्यामुळे तिला शाळा आणि खेळ या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला.
पहाटे पाच ते सात आणि सांयकाळी चार ते सात असा तिचा कबड्डीचा सराव सुरु असतो. कबड्डी सोबतच ती वैयक्तिक खेळात देखील दमदार कामगिरी बजावत आहे. ज्युदो, धावणे व गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारात देखील वर्षा आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे.
वडिलांचे स्वप्न होते की, मी पोलीस दलात दाखल व्हावे, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी माझी तयारी आहे. यासाठी मला सागर बनसुडे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे वर्षा हिने सांगितले.