पुणे : महाराष्ट्र केसरी २०२३ ची स्पर्धा पुण्यात सुरु आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे आज समजणार आहे. माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यात लढत होणार आहे. तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
सर्व मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’ चा किताब जिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. या दोन्ही लढतीकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बालारफिक शेखला केवळ ३० सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.
तर माती विभागातील अंतीम लढत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीतील अंतीम फेरीत पोहोचेल.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. गादी विभागाची अंतिम लढत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहचेल.
दरम्यान, आज संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि त्यानंतर माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येणार आहेत. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. या स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
मात्र महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख व हर्षवर्धन सदगीरसुद्धा महाराष्ट्र केसरी २०२३चा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.