ढाका: बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला ढाका प्रीमियर लीग सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने ढाक्याच्या बाहेरील सावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावर येथे मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यात खेळत असताना तमिमला हृदयविकाराचा झटका आला.
छातीत दुखू लागल्यानंतर तमीमला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, सावरमधील बीकेएसपी मैदानावर हेलिकॉप्टर लँडिंगची सुविधा नव्हती आणि तेथून त्याला एअरलिफ्ट करता आले नाही, असे सामनाधिकारी देबब्रत पॉल यांनी सांगितले. नंतर त्याला फजिलातुन्नेस रुग्णालयात नेण्यात आले.
तमीम इक्बालने या वर्षी जानेवारीमध्ये दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यापूर्वी, जुलै २०२३ मध्ये, त्यांनी भावनिक पत्रकार परिषदेत अशीच घोषणा केली होती. परंतु, बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याची समजूत घातल्यावर २४ तासांत त्यांनी आपला निर्णय बदलला. तथापि, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर होण्यापूर्वीच तो पुन्हा निवृत्त झाला.
बांगलादेशच्या माजी कर्णधाराने सिल्हेटमध्ये बांगलादेशच्या निवडकर्त्यांना त्याच्या निर्णयाची माहिती दिली. गाझी अशरफ हुसेन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने त्याला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राष्ट्रीय संघात पुन्हा सामील होण्याचा आग्रह केला होता. परंतु, तमीम निवृत्तीवर ठाम राहिला. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोसह काही खेळाडूंनी त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. पण त्याने निवृत्तीची पुष्टी करण्यापूर्वी आणखी एक दिवस घेतला आणि नंतर आपला निर्णय जाहीर केला. तमीम इक्बाल शेवटचा २०२३ मध्ये राष्ट्रीय संघाकडून खेळला होता. त्याने बांगलादेशसाठी ७० कसोटी आणि २४३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ५,१३४ आणि एकदिवसीय सामन्यात ८,३५७ धावा केल्या आहेत. त्याने ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १,७५८ धावाही केल्या आहेत.