(Suryakumar Yadav) पुणे : धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव आता त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. शेवटच्या सहा डावात तो चौथ्यांदा पहिल्या चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आता तो आयपीएलमध्येही फ्लॉप ठरत आहे.
सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर सातत्याने धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. ही केवळ मुंबई इंडियन्सच नाही, तर टीम इंडियासाठीही चिंतेची बाब आहे. आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात सूर्यकुमार यादव मात्र (पुन्हा एकदा) पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
सूर्याचा गेल्या सहा डावांतील हा चौथा गोल्डन डक…!
सूर्याचा गेल्या सहा डावांतील हा चौथा गोल्डन डक ठरला. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपासून झाली. तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्याच वेळी त्याच्या आवडत्या टी२० फॉरमॅटमध्येही त्याचा प्रभाव दिसून आला. आयपीएल २०२३ मध्ये, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत तीन सामन्यांत एकूण फक्त १६ धावा केल्या आहेत.
दरम्यान, सूर्यकुमार यादवची बॅट काही काळापूर्वीपर्यंत जोरदार बोलत होती, पण आता ती शांत झाली आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीला डाग लावण्याचे काम केले आहे. तो आयपीएल 2023 पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीनही सामन्यांमध्ये तो गोल्डन डकचा बळी ठरला होता.