हैदराबाद: आयपीएलमध्ये आज (दि. २६) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुध्द लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना ब्लॉकबस्टर होऊ शकतो. कारण दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे, जे हैदराबादच्या पाटा खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडू शकतात. त्यामुळे चाहत्यांचे या सामन्यात भरपूर मनोरंजन होऊ शकते. दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना झाला असून हैदराबादने पहिला सामना जिंकला आहे. तर लखनौने पहिला सामना गमावला असून ते पहिल्या विजयाच्या शोधात असतील.
लखनौ सुपर जायंट्सविषयी बोलायचे झाले, तर त्यांचे अनेक वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. मोहसीन खान तर संघाबाहेरच झाला आहे. अशातच त्यांच्यापुढे एक समस्या वेगवान गोलंदाजाची जरूर असेल. कारण शार्दूल ठाकूरशिवाय दुसरे मोठे नाव या संघाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये सामील नाही. सनरायझर्स हैदराबादच्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, मागील सामन्यात इशान किशनला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. आता हे पाहावे लागेल की, तो या सामन्यात पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे की त्याला आणखी थोडा वेळ लागेल.
राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवरील खेळपट्टीविषयी बोलायचे म्हणजे, या मैदानावर खूप धावा निघतात. हे मागील सामन्यातही पाहावयास मिळाले आहे. ट्रॅविस हेड व अभिषेक शर्माची जोडी यावेळीही या मैदानावर नवे विक्रम स्थापित करू शकते. तसेही म्हटले जात आहे की, या हंगामांत ३०२ धावा निघू शकतात व कोणास ठाऊक की हा कारनामा सनरायझर्स हैदराबादच करून दाखवेल.