मुंबई : न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा अवघ्या १ धावाने पराभव केला. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा ३-० असा पराभव केला. आयर्लंडचा पराभव झाला असतानाही त्याने चाहत्यांची मने जिंकले आहे.
आयर्लंडचे दोन फलंदाज पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टरने जबरदस्त प्रदर्शन केलं. न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाने अवघ्या १ रन्सने रोमांचक विजय मिळवला. आयर्लंडचा मागच्या चार पैकी तीन सामन्यात अटीतटीच्या लढतीत पराभव झाला होता. भारताविरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात अवघ्या ४ रन्सनी त्यांचा पराभव झाला होता. पहिल्या वनडेत न्यूझीलंडकडून एक विकेटने आणि आता तिसऱ्या वनडे १ रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टिलच्या शतकाच्या जोरावर ३६० धावा केल्या, मात्र यजमानांनी शानदार फलंदाजी करत ५० षटकांत ९ गडी गमावून ३५९ धावा केल्या. हा सामना आयर्लंडने अवघ्या एका धावेने गमावला. आयर्लंड कडून सलामीवीर पॉल स्टर्लिंग (१२०) आणि हॅरी टेक्टर (१०८) यांनी शतक केले.
दरम्यान, शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी ६ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या चेंडूवर हुमेने सिंगल धाव घेतली. पुढच्या चेंडूवर यंगने चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर यंग एक रन्स पूर्ण करुन रनआऊट झाला. ५ व्या चेंडूवर लिटिलने सिंगल घेतला. शेवटच्या चेंडूवर आयर्लंडला विजयासाठी 3 आणि टायसाठी २ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर एकच धाव निघाली.