नवी दिल्ली : 2023 च्या विश्वचषकातील पाकिस्तानचा प्रवास संपला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघ केवळ 4 सामने जिंकू शकला आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला. पराभवानंतर खेळाडू आणि कर्णधारही बदलण्याची चर्चा आहे. दरम्यान, एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीनेही याला दुजोरा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्केलला यावर्षी जूनमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले होते. म्हणजे अवघ्या 5 महिन्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला. ते पाकिस्तान सुपर लीगमध्ये सपोर्ट स्टाफ म्हणूनही काम करत आहेत.
जिओ न्यूजच्या बातमीनुसार, पीसीबीने मॉर्नी मॉर्केलसोबत 6 महिन्यांचा करार केला होता. आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मॉर्केलने (Morne Morkel) राजीनामा दिल्याचे पीसीबीच्या सूत्राने सांगितले. त्यांच्या जागी माजी वेगवान गोलंदाज उमर गुलला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. विश्वचषकापूर्वी आशिया कप 2023 मध्येही पाकिस्तानची कामगिरी चांगली नव्हती. हा संघ सुपर-4 फेरीतूनच बाहेर पडला होता. मिळालेल्या वृत्तानुसार बाबर आझम देखील कर्णधारपदाचा राजीनामाही देऊ शकतो.
पाकिस्तान करणार ऑस्ट्रेलियचा दौरा :
पाकिस्तानला विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. तेथे त्यांना 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशात उमर गुलला संघासोबत ऑस्ट्रेलियाला पाठवले जाऊ शकते. पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ येथे होणार आहे. याशिवाय दुसरा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनीमध्ये खेळवला जाईल.