नवी दिल्ली: मोहम्मद शामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी हिरो ठरला. शामी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. आता विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहम्मद शामीचे नाव क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारासाठी पुढे केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाला अर्जुन पुरस्काराच्या यादीत शमीचे नाव समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. कारण शमीचा त्या यादीत समावेश नव्हता. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
या वर्षीच्या क्रीडा पुरस्कारांवर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयाने 12 सदस्यीय समिती स्थापन केली आहे, ज्यात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एएम खानविलकर असतील. त्यांच्याशिवाय, समितीमध्ये माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले एकूण ६ सदस्य असतील.
विश्वचषक 2023 मध्ये, शामीने 7 सामन्यात 10.71 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या, जे या स्पर्धेतील कोणत्याही गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक विकेट होत्या. विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये शामी बेंचवर बसलेला दिसला होता. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यातून शामीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आणि पुढे काय झाले हे सर्वांनी पाहिले. शामी विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला.