नवी दिल्ली: आयपीएलमध्ये प्रथमच खेळाडूंचा महालिलाव विदेशात भरवण्याचे नियोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केले आहे. त्यानुसार सौदी अरेबियातील रियाधमध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस लिलाव भरवण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. याबाबत सर्व फॅन्चायझींना कळवण्यात आले आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व दहा फॅन्चायझींच्या कायम ठेवणाऱ्या खेळाडूंच्या याद्या गत आठवड्यात सादर केल्या.
मात्र, के. एल. राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, एडन मार्कराम, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस यांच्यासह अनेक बड्या खेळाडूंना मुक्त करण्यात आले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या या खेळाडूंना लिलावात खरेदी करण्यासाठी फॅन्चायझीमध्ये चढाओढ पाहण्यास मिळेल. रियाधमध्ये २४ ते २५ नोव्हेंबर रोजी लिलाव आयोजित केला जाऊ शकतो. सर्व फॅन्चायझीनी एकूण ४६ खेळाडूंना ५५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कायम ठेवले. कायम ठेवलेल्या एकूण ४६ खेळाडूंपैकी ३६ भारतीय आहेत.