ढाका : शाकिब अल हसन व इबादत हुसैन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेश संघाने भारताला केवळ ४१.२ षतकांत सर्वबाद १८६ धावांवर रोखले. भारतीय संघाकडून केवळ केएल राहुल याने अर्धशतकी खेळी करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.
ढाका येथील शेर ए बांगला येथील मैदानावर झालेल्या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चांगलाच अंगलट आला. भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पाचव्या षटकांत शिखर धवन ७ धावा करून परतला. त्यानंतर रनमशीन विराट कोहली देखील ९ धावा करून परतला.
रोहित शर्माने ३१ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी बढती मिळालेला श्रेयस अय्यर देखील फार कमाल दाखवू शकला नाही. श्रेयसने २४ धावा केल्या. के एल राहुलने एकाबाजूने थोडीशी संथ खेळीची सुरुवात करताना लढतीची सूत्रे हाती घेतली.
राहुलने ७० चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. त्याला वाशिंग्टन सुंदर याने १९ धावा करताना सुरेख साथ दिली. मात्र एकाबाजूने सातत्याने पडझड होतच होती. शेवटच्या फलंदाजानी तर केवळ मैदानावर हजेरी लावायचे काम केले.
बांगलादेश संघाकडून शाकिब अल हसन व इबादत हुसैन यांनी भेदक गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. शाकिबने १० षटकांत २ षटके निर्धाव टाकताना ३६ धावांत ५ गडी बाद केले. इबादत हुसेन याने ८.२ षटकांत ४७ धावांत ४ गडी बाद केले. मेहंदी हसन मिर्झाने एक गडी बाद केला.