पुणे : वेस्ट इंडिजविरुद्ध शुकवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. संघाची कमान शिखर धवनच्या सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक आणि विशेषत: एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य, याबाबत बरीच चर्चा केली जात आहे. इंग्लंडचा तारांकित अष्टपैलू बेन स्टोक्सने सततच्या क्रिकेटमुळे शरीरावर पडणाऱ्या ताणाच्या कारणास्तव एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच अन्य काही माजी क्रिकेटपटूंनीही कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेट मागे पडल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी विंडीजविरुद्धची ही एकदिवसीय मालिका महत्त्वपूर्ण ठरू शकेल.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी कर्णधार शिखर धवन आयपीएलचा सुपरस्टार अर्शदीप सिंगचा करू शकतो. याशिवाय गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला स्थान मिळण्याची शक्यता आहे.
कोठे पहाल हा सामना
वेस्ट इंडीज दौऱ्यावरील सर्व सामन्यांचे प्रक्षेपण हे भारतात डीडी स्पोर्ट्सवरून थेट होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण केबल, डीटीएच आणि डीडी फ्री डीशद्वारे फक्त डीडी स्पोर्ट्सवरूनच होणार आहे. याबाबत प्रसार भारताचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी सांगितले की, ‘भारतात खेळ आणि मनोरंजन जगतात क्रिकेट आघाडीवर आहे यात शंका नाही. आगामी वेस्ट इंडीज दौरा आम्ही डीडी स्पोर्ट्सद्वारे प्रसारित करणार आहोत त्याबद्दल खूष आहोत.’
संघ
भारत :
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज :
निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स.