पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान आजपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना होत आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे नेतृत्व शिखर धवन तर विंडीजचे नेतृत्व निकोलस पूरन करणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. भारताने या दौऱ्यावर रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आले आहे.
याचबरोबर संघाचा उपकर्णधार रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. आजच्या सामन्यात शिखर धवन सोबत कोण सलामीला येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संघात इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल हे तीन सलामीवीर आहेत. नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले आहे. शिखर धवन आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले आले आहेत.