IND vs ENG 4th Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना सोमवारी रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या या विजयात शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विननेही खारीचा वाटा उचलला.
इंग्लंड संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे इंग्लंडकडे पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी होती. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारतीय संघाने ६१ षटकांत ५ गडी गमावून पार केले.
जुरेलच्या बॅटमधून विजयी धावा आल्या. तो ३९ धावांवर नाबाद राहिला आणि शुबमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून शोएब बशीरने तीन विकेट्स घेत शामदार कामगिरी केली.
हार्टलेने सलग दोन चेंडूंवर जडेजा आणि सर्फराझ खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सर्फराज खाते उघडू शकला नाही आणि झेलबाद झाला. यानंतर जुरेल आणि शुबमनने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी स्ट्राईक रोटेट करत भारताला विजयाकडे नेले. शुभमनने कसोटी कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.
आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात भारताला ८४ धावांवर पहिला धक्का बसला, जो रूटने यशस्वी जैस्वालला जेम्स अँडरसनकरवीने झेलबाद केले. त्याला ३७ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रोहितला ५५ धावा करता आल्या. रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकला नाही आणि चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.