Dombivali News : डोंबिवली : जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर गाठायची इच्छा अनेकांच्या मनात असते. मात्र, अथक प्रयत्न करूनही प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. मात्र, डोंबिवलीतील एका अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने हे स्वप्न पाहिले आणि पूर्णत्वास देखील नेले. वडिलांसमवेत तीने जगातील उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जाऊन अनोखी उंची गाठली आहे. (Kamal, a 5-year-old boy from Dombivli, successfully climbed Everest Base Camp with his father…)
प्रिशा निकाजू या डोंबिवलीतील पलावा फेज दोनमध्ये राहणाऱ्या अवघ्या ५ वर्षीय चिमुरडीने जगातील सर्वांत उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचे स्वप्न पाहिले. (Dombivali News) त्यासाठी प्रिशा रोज ५ ते ६ मैल चालत असे. तिने दोन वर्षांची असल्यापासून ट्रेकिंग करण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर तिने सिंहगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, सोंडाई, कोथळी गड, प्रबळमाची, कलावंतीणीचा गड, रायगड असे अनेक गड लिलया सर केले आहेत. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तिने कळसूबाई शिखर सर केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रिशा एव्हरेस्ट चढाईसाठी सज्ज झाली.
प्रिशा हिने वडील लोकेश निकाजू यांच्यासोबत एव्हरेस्ट बेसकॅम्पपर्यंत जाण्याचे ठरवले. केवळ नऊ दिवसांत ती १७ हजार ५९८ फूट उंचीवर पोहचली. विशेष म्हणजे एव्हरेस्ट बेस सर करताना तिला कोणताही त्रास झाला नाही, असे तिचे वडील लोकेश निकाजू यांनी सांगितले. तिला कराटे, टेबल टेनिस, पोहणे आवडते. त्यामुळे ती सतत या सर्व खेळांचा सराव करत असते, असे तिची आई सीमा निकजू सांगतात. (Dombivali News) ज्या वयात लहान मुलं खेळण्यात, दंगामस्ती करण्यात गुंग असतात, त्याच वयात प्रिशाने एव्हरेस्ट चढण्याचा निर्धार केला, आणि ती उंची गाठली.
प्रिशाचे वडील लोकेश निकाजू यांना ट्रेकिंगची आवड आहे. दर शनिवार-रविवार ते प्रिशाला घेऊन ट्रेकिंगला जात असल्याचे ते सांगतात. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियारींग अँड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेचे ते माजी प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामुळे ते स्वतः प्रिशाला मार्गदर्शन करतात.
अशी गाठली एव्हरेस्टची उंची…
प्रिशा व तिचे वडील लोकेश निकाजू यांनी २४ जून रोजी नेपाळमधील लुकला या ठिकाणाहून ट्रेकिंग सुरु केली. ६ तास ट्रेकिंग करत ते फाकडिंग याठिकाणी पोहचले. तेथे रात्री आराम केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता ट्रेकिंग सुरू केलं. सायंकाळी ७ वाजता म्हणजे ११ तासांची ट्रेकिंग करून नामचे बजार या ठिकाणी पोहोचले.(Dombivali News) त्यानंतर तिसऱ्या दिवशी टेंगबोचे आणि चौथ्या दिवशी टेंगबोचे ते डेबूचे, पाचव्या दिवशी डिंगबोचे येथे पोहचले. सहाव्या दिवशी त्या ठिकाणीच मुक्काम केला. सातव्या दिवशी त्यांनी डिंगबोचेपासून आपला प्रवास सुरु केला. लोबूचे या ठिकाणी प्रवास करत त्याच ठिकाणी आठव्या दिवशी मुक्काम केला आणि अखेर शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी लोबूचे ते एव्हरेस्टचा बेस कॅम्प प्रवास करत जमिनीपासून 17 हजार 598 फूट उंची गाठली.