पुणे प्राईम न्यूज : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नईत खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डेव्हिड वॉर्नरने आठवी धाव घेताच विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वात जलद हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाला आहे.
डेव्हिड वॉर्नरने तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम…
डेव्हिड वॉर्नरने 19 वर्ल्डकप इनिंगमध्ये हजार धावांचा आकडा गाठला आहे. तर सचिन तेंडुलकरने 20 डावात ही कामगिरी केली होती. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्सने 20 डावात हजार धावा केल्या आहेत. व्ही. रिचर्ड्स आणि सौरव गांगुली यांनी 21-21 सामन्यांमध्ये हजार धावा केल्या आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क वॉ आहे. मार्क वॉने वर्ल्डकपमधील २२ डावांमध्ये हजार धावा केल्या होत्या.
‘या’ कांगारू फलंदाजांनी विश्वचषकात केल्या आहेत हजार धावा
डेव्हिड वॉर्नर विश्वचषकात हजार धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. याआधी मार्क वॉ, रिकी पाँटिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी वर्ल्ड कपमध्ये हजार धावांचा आकडा गाठला आहे. मात्र, वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या नावावर २२७८ धावा आहेत.
हेही वाचा:
अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली